स्नेहालय

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही सामाजिक स्वार्थासाठी झोकून देऊन काम करत आहेत. ‘स्नेहालय’ या संस्थेचे कार्यकर्तेही त्यापैकीच! गेली २० वर्षे ‘स्नेहालय’ने देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया आणि त्यांच्या मुलांसाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

एकदा एका वेश्यावस्तीत राहणाऱ्या मित्राकडे गेल्यानंतर तिथली परिस्थिती पाहून एक १९ वर्षांचा युवक अस्वस्थ होतो. त्या स्त्रियांच्या जागी आपली आई, बहीण असती तर आपण काय केलं असतं असा प्रश्न पडतो म्हणून या स्त्रियांबद्दल कणव, सहानुभूती असणाऱ्या समवयस्कांना सोबत घेऊन त्याचा प्रवास सुरू होतो. तो आजवर सुरूच आहे. डॉ. गिरीश कुलकर्णीनी १९८९ साली सुरू केलेल्या ‘स्नेहालय’चा व्याप आज प्रचंड वाढलाय आणि विशेष म्हणजे संस्थेला गिरीश कुलकर्णीचं नव्हे तर स्नेहाचा धागा जपणाऱ्या कार्यकर्त्यांचं स्नेहालय म्हणून ओळखलं जातं. व्यक्तीपेक्षा संस्था आणि संस्थेचं काम मोठं हा तिथे साऱ्यांचाच नारा आहे.

चांगल्या घरातील मुलांनी हवं तर आंधळे, अपंग, मतिमंद अशांसाठी काम करावं त्यानी ‘असल्या’ भानगडीत पडू नये असे सल्ले सुरुवातीला गिरीश व त्यांच्या मित्रांना वारंवार मिळत. तरुण मुलं आहेत बहुदा यांना फुकटात मजा मारायची असेल अशी विखारी टीका सहन करत गिरीश कुलकर्णी, दीपक पापडेजा, मार्गसिद्धा पवार, कल्पना धुपधरे, प्रशांत मोग, प्रकाश सावडेकर, भूषण देशमुख, दीपक रामदीन, संजय लोढा, गणेश कांकरिया, अनिल कुडिया आदींनी वेश्यांच्या मुलांसाठी संस्कारवर्ग, रानसेवा केंद्र सुरू केलं. मात्र मुलं मोठी झाली की पुन्हा व्यसनाच्या गर्तेत आणि मुली वेश्याव्यवसायात अडकतात असं लक्षात आलं. एके दिवशी मध्यरात्री दीड वाजता रेड लाईट एरियातील काही स्त्रिया स्नेहालयच्या कार्यालयात सागर नावाच्या मुलाला घेऊन आल्या आणि त्याला तुमच्याकडेच ठेवून घ्या असा आग्रह करू लागल्या. एका वेश्येला झालेला तो मुलगा होता. ती दारू पिऊन संतापात त्याला मारहाण करत असे. रागाच्या भरात तिने त्याच्या डोक्यात दगड घातल्याने इतर स्त्रिया त्याला स्नेहालयमध्ये घेऊन आल्या होत्या. जागा नाही, पैसा नाही. आम्हीच आमच्या आयुष्यात स्थिर नाही. अशा सबबी सांगितल्या असत्या तर आज स्नेहालय उभं राहिलं नसतं. गिरीश कुलकर्णीनी त्या मुलाची जबाबदारी घेतली आणि त्याच्यावर उपचार केले. जगेल की नाही अशा अवस्थेत आलेला सागर पुढे १२ वर्षे जगला. स्नेहालयचा अर्थ लोकांना खऱ्या अर्थाने कळू लागला.

Charity begins at home म्हणत गिरीश कुलकर्णीनी वेश्यांची मुले स्वत:च्या घरात आणून ठेवली. पुढे एम.आय.डी.सी. जवळची मनसुखलाल मुथा यांची जागा संस्थेला मिळाली. मधुबेन गादियांनी बांधकामाला मदत देऊ केली. सुवालाल िशगवी या अहमदनगरच्या सराफांनी संस्थेच्या कार्याला वाहून घेतलं. मुलं संस्थेमध्ये तीन तास चांगलं वागायची पण उरलेले २०-२२ तास ती पुन्हा वस्तीत असायची. गिऱ्हाईक मुलांना दारू, सिगारेट आणायला सांगायची, मुलींचं शोषण करायची. मुलं त्यामुळे व्यसनाधीन व्हायची. सुरुवातीला या बायका आपली मुलं चोवीस तास संस्थेत ठेवायला तयार नसत. अशात मुलांवर संस्कार करणं कठीण जायचं म्हणून मुलांना वस्तीपासून दूर ठेवावं असं ठरलं. अगदी पत्र्याच्या शेडपासून सुरुवात झाली. स्नेहालयला सुरुवातीला फक्त तीन मुलं मिळाली. त्यांनाही पत्र्याच्या शेडमध्ये आवडत नव्हतं. खेळ, सिनेमा असे तिथे काही नसल्याने मुलं पळून जायची. मग त्यांना पकडून आणावं लागे. कधी कधी मुलांच्या आया त्यांना भेटायला यायच्या अन् मुलांना परत नेता यावं म्हणून कडाडून भांडायच्या. त्या काळात साऱ्यांनीच खूप कष्ट उपसले. जेवणाची पुरेशी सोय नव्हती. पाणीसुद्धा आसपासच्या कंपन्यांकडून आणावं लागे.

एकदा एक बाई दारू पिऊन िधगाणा घालू लागली. गुंडांना सोबत आणून ती मुलीचा ताबा मिळवू पाहात होती. घरवालीचं कर्ज फेडता यावं म्हणून तिनं आपली मुलगी विकली होती. पोलिसांना बोलवावं लागलं. बाई शिव्या देत निघून गेली. एक ना अनेक अडथळे आले तरीही संस्थेचे कार्यकर्ते आपापली नोकरी, शिक्षण सांभाळत जमेल ती जबाबदारी पार पाडत.

१९९२ साली ललिता नावाची वेश्या नगरच्या चित्रा गल्लीत अखेरच्या घटका मोजत होती. ‘कामाची नसल्याने’ घरवालीने तिला घराबाहेर काढलं होतं. विजयाताई लवारे या पुण्याच्या समाजसेविकादेखील स्नेहालयच्या एक प्रेरणास्थान होत्या. त्यांनी सांगितले की, तुम्ही ललिताला जीवन देऊ शकत नाही. निदान तिला माणसासारखं मरण मिळेल याची तरी व्यवस्था करा. बांबूच्या चटया वापरून ललितासाठी घर बांधण्यात आलं. तिथे ललिता आणि तिच्या एच.आय.व्ही. मुलीला ठेवण्यात आले. भारतातलं हे एडस्ग्रस्तांची काळजी घेणारं पहिलं निवासी केंद्र ठरलं! स्नेहालयाच्या कार्यकर्त्यांनी ललिताची सेवाशुश्रूषा केली आणि सहा महिन्यांनी ललिताने जगाचा निरोप घेतला. या घटनेने वेश्यावस्तीतील स्त्रियाही हेलावल्या. साऱ्यांनी वर्गणी गोळा केली आणि ललितावर अंतिम संस्कार केले. प्रेमानं लोक बदलू शकतात हा स्नेहालयचा विश्वास अजूनच दृढ झाला.

स्नेहांकुरमधील बालकांना कायदेशीररीत्या दत्तक देण्यात येऊन त्यांना चांगलं आयुष्य देण्याचाही प्रयत्न केला जातो

लोकांना काम दिसत होतं. मुंबईतील ‘प्रेरणा’ या संस्थेला परदेशी मदत मिळवून दिली. जयप्रकाश संचेती यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने दीड लाख रुपये जमवून दिले. उभय खानदेशंेनी दिवसरात्र खपून बांधकाम पूर्ण करून दिलं. हळूहळू मोठी नावंही स्नेहालयशी जोडली जाऊ लागली. आज स्नेहालयच्या हितचिंतकांमध्ये एस. एन. सुब्बाराव, डॉ. निकोलस नोबेल, डॉ. मार्सिया वॉरेन, अण्णा हजारे, विकास आमटे, पोपटराव पवार, मामा कौंडिण्य या मान्यवरांसह ४०,००० हून अधिक व्यक्तींचा समावेश आहे. लोक सहभागातून मदत उभी राहिली तसतशी पीडित महिला आणि मुलांची संख्याही वाढली. आजवर स्नेहालयने २००० हून अधिक वेश्या, त्यांची मुले, पुरुष यांना आरोग्य सेवा पुरविली आहे तर अवैध मानवीवाहतुकीतून वेश्याव्यवसायात आणल्या जाणाऱ्या ५० हून अधिक स्त्रियांचं आयुष्य बरबाद होण्यापासून वाचवलंय.

गिरीश कुलकर्णीनी आवड आणि परिस्थितीची गरज म्हणून पत्रकारितेची पदवी, व्यवस्थापन क्षेत्रातील मास्टर्स डिग्री मिळवली आहे. कामगार कायद्याचाही त्यांनी अभ्यास केला आणि अथक परिश्रमातून समाजविज्ञान व राज्यशास्त्रात डॉक्टरेटही मिळवली. अहमदनगरच्या सारडा कॉलेजमध्ये ते राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. या प्रवासात त्यांना त्यांच्या भावाची आणि पत्नी- प्राजक्ताची मोलाची साथ मिळाली. पत्नी गरोदर असताना त्यांच्या घरात एच.आय.व्ही. पॉझिटिव्ह महिलांनी त्यांना आधार दिला. तीन वर्षे या महिला त्यांच्या घरीच राहिल्या. चहा, वडापाव, स्वत: बनवलेले साबण इत्यादी गोष्टींची विक्री करत ते लढत राहिले. स्वत: कष्ट उपसून संस्था उभी करूनही कामासाठी झोकून देणारे कार्यकर्ते घडवून त्यांना पुढची जबाबदारी सोपवण्यात गिरीश सर धन्यता मानतात. त्यांच्याच मुशीत तयार झालेले अनिल गावडे, अंबादास चव्हाण, संदीप कुसळकर, अजय वाबळे इ. आज स्नेहालयची धुरा उत्तमपणे सांभाळत आहेत. प्रवीण मुत्याल, मीनाताई िशदे, पुष्पाताई बागुल इत्यादी पुनर्वसन केंद्रातून बाहेर पडून स्नेहालयच्या वेगवेगळ्या परिषदांसाठी संगीता शेलार या शोषित महिलांपैकी एक असलेल्या भारतातील महिलांच्या प्रतिनिधी म्हणून मेक्सिको येथे उपस्थित होत्या. अशा इतरही अनेक उदाहरणांमुळे आजही व्यवसायात असलेल्या स्त्रियांना आशेचा किरण दिसत आहे. आजवर लाभलेले कार्यकर्ते हेच स्नेहालयची खरी संपत्ती आहे. गिरीश सरांच्याच शब्दात मांडायचं झाले तर Leader is not a person who can perform better than his people but leader is person who inspire his people to perform better than himself.

सर्वोत्कृष्ट चाईल्डलाईन
स्नेहालयच्या एक एक प्रकल्पाला भेट देऊन तिथल्या आठवणी ऐकताना हेलावून जातं. स्त्रिया आणि लहान मुलांना मदत करता यावी म्हणून १९९६ सालापासून सुरू केलेल्या हेल्पलाइनचे रूपांतर २००३ साली childline मध्ये करण्यात आले. भारतात ९२ शहरांत असलेल्या childline पैकी अहमदनगर childline सर्वोत्तम मानली जाते. दररोज सुमारे ५० हून जास्त बालकांचे फोन घेतले जातात. बाल कामगारांची मुक्तता, कर्करोग, हृदयरोग, लैंगिक शोषण इत्यादी विषयांवरस्नेहालयच्या childline ची आजवर अनेकांना मदत झाली आहे.

देशभर गाजलेले १४ ते १५ वर्षांच्या बालिकांच्या बाजारू लैंगिक शोषणाचे प्रकरण childline द्वारेच २००६ मध्ये उघडकीस आणले गेले. हे प्रकरण फारच गुतागुंतीचे आणि जास्त आरोपी असणारे होते. लैगिंक शोषणात समाजातील कथित प्रतिष्ठित, राजकारणी, नोकरशहा आणि गुन्हेगारी टोळ्यांचे गुंतलेले हात childline नेच उघड केले. या प्रकरणात न्यायालयाने नुकतीच २० आरोपींना दोन जन्मठेपेची सजा सुनावली आहे. आरोपींना अटक करण्यात, बळी बालिकांचे पुनर्वसन करण्यात, बळींना सहकुटुंब संरक्षण देण्यात उपक्रमाची महत्त्वाची भूमिका होती. अनिल गावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिवावर उदार होत, पैशाच्या मोहाला बळी न पडता केलेल्या कामगिरीचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.

स्नेहांकुर
नगरच्या सिद्धी बागेजवळ कुत्र्यांनी हाता-पायाचे लचके तोडलेलं बाळ असल्याचा स्नेहालयच्या कार्यालयात फोन आला आणि स्नेहांकुर या प्रकल्पाची सुरुवात झाली. स्नेहांकुरमध्ये अनाथ, बेवारस व कुमारी मातांच्या बालकांना आधार दिला जातो. आजही स्नेहालयच्या द्वाराशी ठेवलेली, कचराकुंडीत, उघडय़ावर टाकून दिलेली बालकं सापडतात. स्नेहांकुरमधील बालकांना कायदेशीररीत्या दत्तक देण्यात येऊन त्यांना चांगलं आयुष्य देण्याचाही प्रयत्न केला जातो.

बालभवन
लालटाकी, रामवाडी, संजयनगर, बोरकर नगर, मुकुंदनगरसारख्या नगरच्या झोपडपट्टीतील भागात (२००३ पासून) स्नेहालय ‘बालभवन’ हा उपक्रम चालवते. बालकांचे आरोग्य, शिक्षण व महिला सक्षमीकरणावर बालभवनचा भर असतो. पाठय़पुस्तकातील शिक्षणासोबत कपडे इत्यादी खेळप्रकार आणि शिवणकाम, फॅशन डिझायिनग सारखे व्होकेशनल प्रोग्राम्स शिकवले जातात. आजवर बालभवनमुळे झोपडपट्टीतील ९०० हून जास्त बालकांना प्राथमिक शिक्षणाची संधी मिळाली आहे. १३७५ शाळाबाह्य बालकांना बालभवनने नगरमधील विविध शाळांमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. प्रत्येक ठिकाणी महिला बचत गट स्थापल्याने सावकारांच्या तावडीतून गरीब परिवारांची सुटका झाली आहे. सामाजिक ऐक्य, बालविवाहाची कुप्रथा, आरोग्याची काळजी, व्यसनाधिनतेचे दुष्परिणाम या सारख्या विषयांवरही जागृती केली जाते.

आयटी सेंटर
युवक-युवतींना स्वत:च्या पायावर उभं राहण्यास मदत करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विषयाचे तीन अभ्यासक्रम स्नेहालयच्या ‘I T ’तर्फे चालविले जातात. युवकांमध्ये सामूहिक श्रम, देश व समाजासाठी समर्पण या भावना रुजवण्यासाठी २००६ सालापासून वर्षांतून दोनदा श्रमसंस्कार छावणी आयोजित केली जाते. अण्णा हजारे, मॅगसेसे पुरस्कारप्राप्त रजनीकांत आरोळे, प्रकाश आमटे अशा मान्यवरांना मार्गदर्शनासाठी बोलावलं जातं.

साऱ्यांची चळवळ..
स्नेहायलयचा व्याप एवढा मोठा असला तरी व्यवस्थापन मात्र उत्कृष्ट आहे. करड 9001:2008 मिळाल्याने त्यावर शिक्कामोर्तबही झाले आहे. स्नेहालयमध्ये असलेल्या महिलांची, बालकांची संख्या, त्यांचं आरोग्य याची व्यवस्थित माहिती ठेवली जाते. झोपडपट्टीतील मुलं, त्यांची कुटुंब त्यांच्या उत्पन्नाचं साधन इत्यादी मुद्दय़ावरून वर्गीकरण केलं जातं. उत्कृष्ट व्यवस्थापनात मििलद कुलकर्णीचा मोठा वाटा आहे. मात्र तरीही ही आपली साऱ्यांची चळवळ आहे, हे कुणीच विसरलेलं नाही. स्नेहालयचे सहसंचालक अंबादास चव्हाण म्हणतात ‘वेळ आली तर आम्ही उट सोबतही मीटिंगला बसतो, पण गरज भासली तर संडासही साफ करतो!’

एचआयव्ही- एड्सग्रस्त अनेक मुलं आज स्नेहालयमध्ये आनंदाचं आयुष्य जगत आहेत.

एचआयव्ही मार्गदर्शन केंद्र ‘स्पृहा’
HIV AIDS झालेल्या सुमारे २५०० रुग्णांना स्पृहा समुदाय केंद्राने मनोबल, मोफत उपचार दिले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांसोबत काम करताना भीती नाही वाटत असं विचारलं असता कार्यकर्ते उत्तरतात, ‘जाळातच काम करायचं ठरल्यावर, आगीच्या भीतीने कशाला पळायचं?’
त्यांचा हाच पॉझिटिव्ह दृष्टिकोन आज अनेकांना प्रेरणा आणि नवजीवन देत आहे. अनियमित औषधे घेणाऱ्या व पुढच्या औषधांचे डोस घेऊन न जाणाऱ्या रुग्णांना स्नेहालयचे कार्यकर्ते शोध घेतात आणि त्यांना औषधे वेळेवर घेण्यास प्रवृत्त करतात. एचआयव्हीग्रस्तांना आत्मविश्वास मिळवून देण्यात आणि त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळवून देण्यात ‘स्पृहा’ महत्त्वाची कामगिरी बजावते.

आज स्नेहालयमुळे नगरमधील १८ वर्षांखालील मुलींना वेश्याव्यवसायातून बाहेर काढण्यात यश आलंय. Adoption center मुळे स्त्रीभ्रूणहत्येचं प्रमाणही कमी होतंय. स्नेहालयने पुढाकार घेऊन ४०० पेक्षा जास्त आंदोलने करून सुस्त पोलीस, राजकारणी यांना विधायक पावले उचलण्यास भाग पाडले आहे. ‘तमसो मा ज्योतिर्गमय्’ हे स्नेहालयचं ब्रीदवाक्य जपत आज अनेक विद्यार्थी अंधारातून प्रकाशाकडे झेपावत आहेत. कुणी CRPF तर कुणी BASF मध्ये गेलंय. कुणी शिक्षक होऊन चांगली पिढी घडवण्याचा विडा उचललाय. तर संतोष सूर्यवंशीसारखे छोटे दोस्तही childline सारख्या इतर उपक्रमांत आपला हातभार लावत आहेत. अंध व्यक्तींसाठी ‘अनाम प्रेम’ हा नवा प्रकल्प उभा राहतोय. स्नेहालयच्या मुलांकडून कुणाला खेळात नाव कमवायचंय तर कुणाला इंजिनीअर व्हायचंय.. त्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे.

मात्र एवढय़ावरच स्नेहालयचे कार्यकर्ते थांबणारे नाहीत. नगरजवळच हिसळक या गावी २५ एकर परिसरात वेश्यावस्तीतील महिलांच्या पुनर्वसनासाठी ‘िहमतग्राम’ हा प्रकल्प उभा राहतोय. तिथे निवासी संकुल, रुग्णालय, शाळा, सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा मानस आहे. पहिल्या टप्प्यातील कामाचा खर्च अंदाजे २ कोटी होईल. सर्व उपक्रम चालवण्यास स्नेहालयला जवळपास ३ कोटींचा खर्च होतो आणि वर्षांगणिक तो वाढतच चाललाय. भूकंप, त्सुनामीसारख्या आपत्तींच्या वेळी समाजाचा तिरस्कार सहन करत आलेल्या नगरच्या वेश्यांची मदत सर्वात आधी पोहोचली आहे.

स्नेहालयशी संपर्क :
http://www.snehalaya.org
पत्ता- स्नेहालय,२३९, एम.आय.डी.सी. िनबळक गाव,
अहमदनगर-४१४०११.
मोबाईल क्रमांक- ९०११०२०१७१, ९०११२०१८०, ९०११०२६४७२

The above article was published in lokprabhra on 19 Nov 2010-http://www.lokprabha.com/20101119/snehalaya.htm

Advertisements

About Mukesh Bhavsar

Mukesh has done BE Civil from Mumbai University and masters in HRM from Tata Institute of Social Sciences (TISS). He has worked for a couple of NGOs in India and abroad. He has also written for some newspapers and magazines on different social issues. Mukesh is interested in entrepreneurship, writing, social work, travelling, and photography. Follow him on twitter- https://twitter.com/mukeshbhavsar88
This entry was posted in Uncategorized and tagged , , . Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s